भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलंपिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू विवाहबंधनात अडकल्या आहेत. उदयपूरच्या रॅफल्स रिसॉर्टमध्ये झालेल्या या भव्य विवाह सोहळ्याने सिंधूच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. सिंधूने तिच्या दीर्घकालीन मित्र वेंकट दत्त साई यांच्यासोबत तेलुगू पारंपरिक पद्धतीने विवाह केला.

शनिवारी पारंपरिक मेहंदी आणि संगीत कार्यक्रमानंतर, रविवारी रात्री दोघेही विवाहबद्ध झाले. सिंधूने क्रीम रंगाची साडी परिधान केली असून ती पूर्णपणे दक्षिण भारतीय वधूसारखी दिसत आहे. त्याचप्रमाणे वेंकटनेही क्रीम रंगाची शेरवानी घातली आहे. उपस्थित पाहुण्यांनीही दक्षिण भारतीय परंपरेला साजेशी वेशभूषा केली होती.
डेस्टिनेशन वेडिंग
सिंधू आणि वेंकटने डेस्टिनेशन वेडिंगचा अनुभव घेतला. हा विवाह सोहळा अत्यंत खासगी ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये फक्त निकटचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते. सोशल मीडियावर जास्त गोंधळ न करता विवाहाचं सर्व नियोजन करण्यात आलं. सिंधूने 14 डिसेंबर रोजी वेंकटसोबतच्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोत त्यांनी एकमेकांच्या हातात अंगठी घातल्याचं पाहायला मिळालं.
रिसेप्शन हैदराबादमध्ये
24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. सिंधू आणि वेंकटच्या विवाह सोहळ्याच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चाहत्यांनी नवदांपत्याला सुखद वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





