राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या शौर्याचा थाट:
खडकवासला, पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 147 व्या कोर्सच्या पासिंग आउट परेडमध्ये 357 कॅडेट्स ने सहभाग घेतला. हा समारंभ NDA च्या खेत्रीपाल परेड मैदानावर आयोजित करण्यात आला होता. हिवाळी सत्र 2024 च्या या ऐतिहासिक परेडचे निरीक्षण हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी केले.
विशेष वैशिष्ट्ये:
- 1,265 कॅडेट्स परेडमध्ये सहभागी झाले, ज्यामध्ये 357 पासिंग आउट कॅडेट्स होते.
- यात 215 लष्कर कॅडेट्स, 38 नौदल कॅडेट्स, आणि 104 हवाई दल कॅडेट्स यांचा समावेश होता.
- तसेच, 19 मैत्रीपूर्ण देशांमधून आलेल्या कॅडेट्स यांनी देखील भाग घेतला. (भूतान, ताजिकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश, मलेशिया, सुदान, टांझानिया, केनिया, झांबिया आणि मालदीव).
- 47 महिला कॅडेट्स नी देखील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टर्मच्या प्रशिक्षणादरम्यान सहभाग घेतला.

पुरस्कार आणि सन्मान:
- कॅडेट अंकित यांना एकूण गुणवत्ता क्रमवारीत प्रथम स्थान पटकावत राष्ट्रपती सुवर्णपदक देण्यात आले.
- कॅडेट युवराज सिंह चौहान यांना दुसऱ्या स्थानासाठी राष्ट्रपती रौप्यपदक, तर कॅडेट जोधा थोंगियाओमयुम यांना तिसऱ्या स्थानासाठी राष्ट्रपती कांस्यपदक प्रदान करण्यात आले.
- गोल्फ स्क्वॉड्रन ने चिफ्स ऑफ स्टाफ बॅनर जिंकून चॅम्पियन स्क्वॉड्रनचा मान मिळवला.

हवाई दल प्रमुखांचे प्रेरणादायी भाषण:
एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी कॅडेट्सना संबोधित करताना NDA मधील प्रशिक्षण आणि बनवलेले संबंध भविष्यातील योजना आणि कार्यवाहीमध्ये कायम ठेवण्याचे आवाहन केले.
“NDA ही केवळ नेतृत्वाची शाळा नाही, तर एक संयुक्तत्वाची पाळणाही आहे,” असे त्यांनी सांगितले.
हट ऑफ रिमेंब्रन्स:
हट ऑफ रिमेंब्रन्स येथे एक विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. येथे NDA च्या शूरवीरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. 10 ते 17 व्या कोर्सच्या कॅडेट्सनी बांधलेली ही वास्तू शौर्य, बलिदान आणि देशभक्तीचे प्रतीक आहे.
प्री-परेड इव्हेंट्स:
परेडपूर्वी शुक्रवारी बॉम्बे स्टेडियममध्ये कॅडेट्सच्या साहस आणि प्रशिक्षण कौशल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
- 275 कॅडेट्स आणि 38 घोडे यांच्या प्रदर्शनाने उपस्थितांना अचंबित केले.
- आकाशगंगा टीमच्या अद्वितीय स्कायडायव्हिंग प्रदर्शनाने रसिकांची वाहवा मिळवली.
- कॅडेट्सनी विविध शारीरिक प्रशिक्षणाच्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
- इक्वेस्ट्रियन टीमच्या म्युझिकल राइडने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
- या प्रदर्शनाचा समारोप हाय हॉर्स टीमच्या टेबलो फॉर्मेशनने 147 व्या कोर्सला निरोप देऊन करण्यात आला.






