
वलसाड: रेल्वे मार्गांवर खळबळ माजवणाऱ्या सिरीयल किलरला वलसाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हरियाणाच्या रोहतकमधील राहूल सिंग जाट (२९) या आरोपीने गेल्या एका महिन्यात पाच खून केल्याची कबुली दिली आहे. वलसाडमधील १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या या कुख्यात आरोपीला वलसाड पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून ताब्यात घेतले.
प्रकरणाचा उलगडा:
नोव्हेंबर १४ रोजी वलसाडमधील उधवाडा रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. पीडित मुलगी शिकवण्या आटोपून घरी परतत असताना राहूल जाटने तिच्यावर हल्ला करून बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. घटनास्थळी राहूलने टाकलेली टी-शर्ट आणि पिशवी पोलिसांसाठी महत्वाचे धागेदोरे ठरले.
२००० सीसीटीव्ही फूटेज तपासले:
वलसाड, वलसाड, सुरत आणि उधवाडा येथील २००० सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी केल्यानंतर आरोपीचा फोटो हाती लागला. हा फोटो सुरतच्या लाजपोर सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांनी ओळखला. या आधारे राहूलला २४ नोव्हेंबर रोजी वलसाड रेल्वे स्थानकाजवळून अटक करण्यात आली.
रेल्वेमध्ये साखळी गुन्ह्यांची कबुली:
वलसाडचे पोलीस अधीक्षक करनराज वाघेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल सिंग जाटने कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये रेल्वेमध्ये लुटालूट आणि खून केल्याची कबुली दिली आहे. एका महिन्यात पाच खून केल्याचेही त्याने सांगितले.
भूतकाळातील गुन्ह्यांची यादी:
- सिकंदराबाद (तेलंगणा): एका महिलेवर हल्ला करून तिची हत्या.
- सोलापूर (महाराष्ट्र): महिलेवर बलात्कार आणि खून.
- हावडा (पश्चिम बंगाल): कटीहार एक्सप्रेसमधील वृद्ध व्यक्तीची चाकूने हत्या.
- मुल्की (कर्नाटक): प्रवाशाचा खून.
राहूलवर हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ट्रक चोरी आणि बेकायदेशीर शस्त्रसाठ्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
कुटुंबाने तोडले संबंध:
राहूल फक्त पाचवीपर्यंत शिकला असून लहानपणापासून तो चोरी आणि गुन्हेगारीत गुंतलेला होता. त्याच्या वाईट सवयींमुळे कुटुंबाने त्याच्याशी संबंध तोडले होते.
वलसाड पोलिसांचे मोठे यश:
“वलसाड पोलिसांनी केलेल्या सखोल तपासादरम्यान आरोपीने पाच खून आणि अनेक लुटीच्या घटना कबूल केल्या. त्याला पकडण्यासाठी हरियाणा, राजस्थान आणि कर्नाटकच्या पोलिस यंत्रणांनी मोठा शोधमोहीम राबवली,” असे पोलीस अधीक्षक वाघेला यांनी सांगितले.





