पिंपळे सौदागर येथे स्थित लिनियर गार्डनमध्ये आयोजित चैतन्य हास्य क्लब व ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कार्यशाळेत एक महत्वपूर्ण उपक्रम पार पडला. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिकांनी मतदान करण्याचा ठाम निर्धार केला. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतदान जनजागृती मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला, आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकमुखाने मतदानाची शपथ घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या मतदारसंघांतून मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महापालिकेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तसेच स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणात ही मोहीम पार पाडली जात आहे. या मोहिमेअंतर्गत लोकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे “करूया योगा, हो मतदार राजा जागा” या संकल्पनेवर आधारित विशेष उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाद्वारे चैतन्य हास्य क्लब व ज्येष्ठ नागरिक संघाने ‘मतदान करा, देश घडवा’ या संदेशासह योग सत्रांचे आयोजन केले. योगाच्या माध्यमातून शरीर, मन आणि आत्मा यांचे एकात्म साधत, ज्येष्ठ नागरिकांनी मतदान प्रक्रियेबाबत जागरूकतेचा संकल्प सोडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सामूहिकरित्या मतदानाची प्रतिज्ञा घेतली व मतदानाचा हक्क बजावण्याचा दृढ संकल्प केला.
महापालिकेच्या या जनजागृती मोहिमेचा उद्देश, केवळ मतदानाचा टक्का वाढविणे नव्हे तर प्रत्येक नागरिकाला त्याच्या मताच्या महत्त्वाची जाणीव करून देणे आहे. महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अशा उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये मतदानाविषयीची जागरूकता वाढत आहे.





