पिंपरी : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी डॉ. कलाम यांच्या अद्वितीय योगदानाची आठवण करून देत, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन केले.
डॉ. कलाम यांची भूमिका क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात अत्यंत मोलाची होती. त्यांच्या नेतृत्वाखाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारताचे संरक्षण क्षेत्र अधिक मजबूत झाले. पोखरण-२ च्या अणुचाचणीमध्ये त्यांनी महत्वाचा वाटा उचलला. त्यांच्या वैज्ञानिक आणि राजकीय योगदानामुळे ते ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हणून जनमानसात लोकप्रिय झाले.
महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत शिंपी, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद नरके, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. कलाम यांचे शिक्षण मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झाले होते, जिथे त्यांनी वैमानिक अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांच्या व्यापक योगदानाबद्दल त्यांना १९९७ साली भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या लेखन कार्यामध्ये “विंग्स ऑफ फायर”, “महानतेच्या दिशेने”, “टर्निंग पॉइंट्स” ही प्रसिद्ध पुस्तके आहेत.
या निमित्ताने, पिंपरी-चिंचवड महापालिकेने डॉ. कलाम यांच्या विचारांचे अनुकरण करत, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे आवाहन केले. त्यांचे जीवन हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, शासकीय कार्यालयांमध्ये जयंती उत्साहाने साजरी करण्याचे निर्देश दिले आहेत.






