पुणे: पुण्यातील रामटेकडी भागात घडलेल्या धक्कादायक घटनेत वानवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयता गँगच्या सदस्यांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना आज दुपारी ४ वाजता ससाणेनगर रेल्वे गेटजवळील न्यू रॉयल ऑटो गॅरेजसमोर घडली. होंडा अॅक्टिवा चालवणाऱ्या इसम आणि त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा दुसऱ्या दुचाकीवरील (हीरो इग्निटर) निहाल सिंग मनू सिंग टाक (वय १८, रा. हडपसर) आणि राहुल सिंग उर्फ राहुल रबिंद्र सिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) यांच्यासोबत वाद झाला. या वादानंतर निहाल सिंग आणि राहुल सिंग यांनी होंडा अॅक्टिवावर बसलेल्या इसमावर लोखंडी रॉडने हल्ला केला.
या घटनेच्या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तेथे हजर होते. त्यांनी भांडण सोडविण्यासाठी कार थांबवली आणि हस्तक्षेप केला. त्यांनी निहाल सिंगकडील कोयता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र निहाल सिंगने कोयता त्यांच्या डोक्यावर फेकला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. या हल्ल्यानंतर निहाल सिंग आणि राहुल सिंग हे दोघेही सईद नगर भागात पळून गेले.

वानवडी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, त्यांच्या विरोधात यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. निहाल सिंग मनू सिंग टाक याच्यावर चोरी, दरोडा, शस्त्र बाळगणे असे एकूण २० गुन्हे, तर राहुल सिंग याच्यावर एकूण १४ गुन्ह्यांची नोंद आहे.
हा हल्ला पुणे शहरात कोयता गँगने केलेल्या हिंसक घटनांच्या मालिकेत आणखी एक गंभीर घटना असून, पोलिस प्रशासनावर हल्ला करण्याचा धोकादायक प्रकार यानंतरही सुरूच आहे.






