पिंपरी चिंचवड, २९ जुलै २०२४: पिंपरी चिंचवड येथे सायन्स पार्कजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल बस आणि ‘लक्झरी’ BMW कारची समोरासमोर धडक झाली. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत, तसेच BMW कार चालकही जखमी झाला आहे. नागरिकांनी कार चालक आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी नेले.
पिंपरी पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेची बस बीआरटी लेनमध्ये प्रवास करत असताना BMW कार विरुद्ध दिशेने येऊन बसला धडकली. या घटनेत दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये १५ विद्यार्थी होते.
पिंपरी पोलिसांनी या अपघाताच्या तपासाला सुरुवात केली आहे. दोन्ही कार चालक आणि बस चालकांची चौकशी सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी वेगाने चालणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.





