महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.या बैठकीनंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधत असताना राज ठाकरे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे. दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झालं आहे . राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडून काय प्रतिक्रिया येईल? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रसार माध्यमांशी बोलत असताना राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये कधीच जातीवरून वाद होत नव्हते. प्रत्येकाला आपापली जात प्रिय असते.प्रत्येकाला आपली जात आवडत असते आणि ती आवडण्याची कारणे वेगवेगळी असतात. स्वतःच्या जातीबद्दल आपलेपणा असणं किंवा स्वतःच्या जातीचा अभिमान असणं, हे आतापर्यंत महाराष्ट्रात होत. मात्र जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्यानंतर दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं महाराष्ट्रात सुरू झालं आहे. राज्यामध्ये जातिवाद सुरू झाला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार व्हायला वेळ लागणार नाही.स्वार्थी राजकारणासाठी काही लोक महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहे. आजपर्यंत महाराष्ट्र प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे आणि यापुढे देखील राहील, असं मला वाटतं. परंतु, महाराष्ट्राच्या प्रतिमेची वाट लावण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे.”दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये निवडणुकांचा प्रचार करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्या मंदिरावरून लोकांना भाजपला मतदान करण्यास सांगितलं आहे. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली तर सर्वांना राम मंदिराचं दर्शन करायला नेऊ, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलत असताना राज ठाकरे यांनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“अमित शाह यांनी नवीन टूर अँड ट्रॅव्हल्स खत उघडलं असेल.❓ निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराचं आमिष का दाखवता? कुणी काय कामं केली? हे सांगून निवडणूक लढवा”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.






