पुणे, दि. ७ मार्च २०२६ : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनावे, असे प्रतिपादन यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले. महिलांनी केवळ नोकरीच्या मर्यादेत न राहता स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पुणे येथील यशस्वी संस्थेच्या मुख्यालयात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्योजिका व व्यावसायिक महिलांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजिका महिलांचा सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी संस्थेच्या प्रशिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना स्मिता धुमाळ म्हणाल्या की, महिलांमध्ये प्रचंड क्षमता आणि सर्जनशीलता आहे. योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आत्मविश्वास मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात. कौशल्य विकास प्रशिक्षण हे महिलांना रोजगार व उद्योजकतेच्या दिशेने नेणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, उद्योग-व्यवसाय करताना महिलांनी कुटुंबातील सदस्यांना देखील आपल्या प्रवासात सहभागी करून घ्यावे. कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास वर्क-लाईफ बॅलन्स अधिक सुलभ होतो आणि व्यवसायाच्या गुणवत्तेवर तसेच प्रगतीवर लक्ष केंद्रित करता येते. महिलांनी आत्मविश्वास, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करावे, असेही त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले. या प्रसंगी स्मिता धुमाळ यांनी त्यांच्या करिअरच्या प्रवासातील विविध अनुभव सांगत विद्यार्थिनींना प्रेरणा दिली. सुरुवातीच्या संघर्षापासून ते यशस्वी संस्थेची उभारणी करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ऐकून उपस्थित विद्यार्थिनींना उद्योजकतेसाठी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थिनींनीही त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासाबद्दल मनोगते व्यक्त केली. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेने दिलेले मार्गदर्शन आणि पाठबळ याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थिनींनी घरातून छोट्या व्यवसायाची सुरुवात करून आज त्याचा विस्तार केल्याचे अनुभवही सांगितले. यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करून उद्योजक आणि व्यावसायिक प्रवास सुरू केलेल्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे महिलांमध्ये अधिक उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी अमृता तेंडुलकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागींचे आभार मानले. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरणा मिळाली असून भविष्यातही अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहत समाजात आदर्श निर्माण करावा आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.