Home Breaking News भांडुप पूर्व – पश्चिम जोडणीसाठी महत्त्वाचा टप्पा : भांडुप रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल...

भांडुप पूर्व – पश्चिम जोडणीसाठी महत्त्वाचा टप्पा : भांडुप रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल प्रकल्पाची गती वाढविण्याचे निर्देश

28
0
भांडुप परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून पूर्व आणि पश्चिम भागातील नागरिकांना अधिक सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने भांडुप रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्गावरील उड्डाणपूल (Road Over Bridge – ROB) उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज प्रत्यक्ष प्रकल्प कार्यस्थळी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी अभियंते व संबंधित अधिकाऱ्यांना विविध तांत्रिक आणि प्रशासकीय निर्देश देत काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.
भांडुप पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांमध्ये सध्या रेल्वेमुळे भौगोलिक अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वळसा घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि नागरिकांची गैरसोय होते. प्रस्तावित उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. स्थानिक नागरिकांसह व्यापारी व दैनंदिन प्रवाशांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
वीर सावरकर मार्गावर ज्या ठिकाणी उड्डाणपूल उतरणार आहे, त्या ठिकाणी पूर्व-पश्चिम संरेखनाशी जोडणी करताना तीव्र वळण (Sharp Turn) येत असल्याची बाब लक्षात घेऊन श्री. बांगर यांनी या डिझाइनची तांत्रिक पडताळणी करण्याचे निर्देश दिले. पुलाचा आराखडा विद्यमान तांत्रिक मानकांनुसार तयार करण्यात आला असला तरी अतिरिक्त सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मधील तज्ज्ञांकडून त्याचे स्वतंत्र मूल्यमापन करून घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय भविष्यातील वाहतूक प्रवाह लक्षात घेऊन वाहतूक अनुकरण अभ्यास (Traffic Simulation Study) करण्याचेही निर्देश देण्यात आले. या अभ्यासातून संभाव्य वाहतूक दाब, वाहनांची हालचाल आणि वळणावरील सुरक्षितता यांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार आवश्यक सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. या सर्व शिफारसींची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही श्री. बांगर यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचे बांधकाम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून ३१ जानेवारी २०२७ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कामाची गुणवत्ता राखत वेगाने काम पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
नागरिकांच्या सोयीचा विचार करून उड्डाणपुलावर सुरक्षित आणि सुगम पदपथ (Footpath) उभारण्याचे निर्देशही देण्यात आले. रेल्वे स्थानकात ये-जा करणारे पादचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी पदपथाची रचना सुलभ आणि प्रवेशयोग्य असावी, यावर विशेष भर देण्यात आला.
या उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे ५३० मीटर इतकी असणार आहे. त्यापैकी रेल्वे मार्गावरून जाणारा भाग सुमारे ८९ मीटर इतका असेल. पुलामध्ये एकूण १४ स्पॅन असणार असून त्यापैकी पूर्व बाजूस ७, पश्चिम बाजूस ५ आणि रेल्वे मार्गावर २ स्पॅन असतील. महानगरपालिका हद्दीत पुलावरील रस्त्याची रुंदी ११.५० मीटर तर रेल्वे हद्दीत १५.६० मीटर ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे वाहनांची हालचाल अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
सध्या या प्रकल्पाची सुमारे ३० टक्के भौतिक प्रगती साध्य झाली आहे. पश्चिमेकडील बाजूस खांबांच्या पायाभरणीचे (Piling Work) आणि पाइल कॅपचे काम पूर्ण झाले आहे. तसेच स्पॅन क्रमांक १ ते ४ दरम्यान तुळई उभारणीचे (Launching of Girder) काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. पूर्वेकडील बाजूस खांब क्रमांक ६ आणि ७ साठी पाइलिंगचे कामही पूर्ण झाले आहे, तर पुढील टप्प्यातील कामे वेगाने सुरू आहेत.
रेल्वे मार्गावरील स्पॅनसाठी आवश्यक असलेल्या पोलादी तुळ्यांची निर्मिती हरियाणातील अंबाला येथे सुरू असून त्या तयार झाल्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार त्या भांडुप येथे आणून बसविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी रेल्वे प्रशासनाशीही समन्वय साधला जात आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात भांडुप परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून पूर्व-पश्चिम प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच परिसरातील आर्थिक आणि सामाजिक हालचालींनाही यामुळे चालना मिळणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी प्रमुख अभियंता (पूल) (अतिरिक्त कार्यभार) श्री. राजेश मुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अभियंते, प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी प्रकल्पाची प्रगती आणि पुढील कामाचा आराखडा यावर सविस्तर चर्चा केली.