मुंबई : होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि एकतेचा ओलावा जपणारा मंगलमय सोहळा आहे. आयुष्यातील दुःख, चिंता आणि तणाव विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक असल्याची भावना व्यक्त करत यंदाची होळी सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध राज्यांतून आलेले Central Industrial Security Force (सीआयएसएफ) चे जवान आज खऱ्या अर्थाने कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग बनले आहेत. आपल्या घरापासून दूर राहून, सण-उत्सवांची पर्वा न करता देशसेवेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या ‘वर्दी’तील भावांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून साधेपणाने पण उत्साहात होळी खेळण्यात आली. जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद, सहकाऱ्यांमधील आपुलकी आणि स्नेह यामुळे वातावरण भारावून गेले. देशसेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या या जवानांसोबत सण साजरा करण्याची संधी मिळाल्याचा विशेष आनंद व्यक्त करण्यात आला.
“देश सुरक्षित आहे कारण हे जवान सज्ज आहेत,” या भावनेतून त्यांच्या त्यागाला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. कुटुंबापासून दूर राहूनही राष्ट्रसेवा प्रथम मानणाऱ्या या जवानांच्या योगदानामुळेच प्रत्येक भारतीय नागरिक सुरक्षित सण साजरा करू शकतो, याची जाणीव यावेळी अधोरेखित करण्यात आली.
होळीच्या निमित्ताने समाजात बंधुभाव, सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली. सर्व नागरिकांना होळी आणि धुळवडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत आनंद, समृद्धी आणि सुरक्षिततेचे रंग प्रत्येकाच्या आयुष्यात खुलत राहोत, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.