शहरातील प्रभाग ४ मध्ये काही दिवसांपासून प्रलंबित असलेली विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच निवडणुकीमुळे ती तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आता ही कामे पुन्हा गतीने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः वाढत्या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
आज सहाय्यक आयुक्त Somnath Bankar यांची भेट घेऊन सध्याची परिस्थिती सविस्तर मांडण्यात आली. प्रभाग ४ मध्ये निवडणुकीनंतर रस्त्यांवर व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याची तक्रार त्यांना लेखी स्वरूपात देण्यात आली. विशेषतः मुख्य रस्ते, डीपी प्लॅनमधील प्रस्तावित रस्ते आणि चौक परिसरात अनधिकृत बांधकामे व फेरीवाल्यांची वाढती संख्या यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. वाहतूक कोंडी, पादचारी मार्ग अडवले जाणे आणि आपत्कालीन सेवांना अडथळे निर्माण होणे यासारख्या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
दरम्यान, काही डीपी प्लॅन रस्त्यांसाठी माजी आयुक्त Rajendra Bhosale यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये वर्क ऑर्डर काढल्या होत्या. त्या वेळी अनिरुद्ध पावसकर हे चीफ इंजिनियर पदावर कार्यरत होते. सध्या ते पदोन्नती होऊन सिटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. तर सध्या चीफ इंजिनियर म्हणून Rajendra Bankar कामकाज पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी वॉर्ड ऑफिसमध्ये सहाय्यक अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली असल्याने स्थानिक परिस्थितीची त्यांना चांगली जाण आहे.
प्रभागातील विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि अतिक्रमणामुळे अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे प्रभा करपे यांनी सांगितले. नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रभाग ४ मधील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.