Home Breaking News महाराष्ट्र ग्लोबल एज्युकेशन पॉवरहाऊसकडे वाटचाल; UIUC प्रतिनिधीमंडळासोबत उच्चस्तरीय चर्चा

महाराष्ट्र ग्लोबल एज्युकेशन पॉवरहाऊसकडे वाटचाल; UIUC प्रतिनिधीमंडळासोबत उच्चस्तरीय चर्चा

मुंबई: महाराष्ट्र जागतिक शिक्षण व संशोधन क्षेत्रात वेगाने उदयास येत असताना, अमेरिकेतील प्रतिष्ठित University of Illinois Urbana-Champaign (UIUC) च्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे मुंबईत स्वागत करण्यात आले. प्रा. सुसन मार्टिनिस, सीनियर व्हाइस चान्सलर (रिसर्च अँड इनोव्हेशन) यांच्या नेतृत्वाखालील या प्रतिनिधीमंडळासोबत अर्थपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण चर्चा पार पडली.
१८० वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरा लाभलेल्या UIUC या जागतिक दर्जाच्या विद्यापीठासोबत महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात होण्याचे संकेत या बैठकीत मिळाले.
सरकार–विद्यापीठ–खाजगी क्षेत्र: विकासाचा त्रिवेणी संगम
बैठकीत कॉर्पोरेट–विद्यापीठ भागीदारी, तसेच सरकार + विद्यापीठ + खासगी क्षेत्र यांचा समन्वय अर्थव्यवस्थेला कसा गती देऊ शकतो यावर सखोल विचारमंथन झाले. संशोधनाधारित उद्योगविकास, नवोन्मेष आणि स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
 एआय क्रांतीत महाराष्ट्राची आघाडी
महाराष्ट्र एआय (Artificial Intelligence) क्षेत्रात देशात आघाडीवर असून, UIUCसारख्या संस्थेसोबत सहकार्य भविष्यातील कौशल्यसंपन्न मानव संसाधन घडवण्यासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. चर्चेत क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अणुभट्ट्या, ऊर्जा, CS+X शिक्षण प्रणाली, बायोमॅन्युफॅक्चरिंग, आंतरशाखीय अभ्यासक्रम आणि ब्लेंडेड डिग्री कार्यक्रम अशा प्रगत क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला.
युवकांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन आणि डिझाईन थिंकिंग विकसित करण्यावरही चर्चा झाली. जागतिक दर्जाच्या संशोधनासोबत उद्योगस्नेही शिक्षण पद्धती विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
 नवी मुंबईतील ‘इंटरनॅशनल एज्यु सिटी’चे स्वप्न
नवी मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या ‘इंटरनॅशनल एज्यु सिटी’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात UIUCने सहभाग घ्यावा, असे आमंत्रण देण्यात आले. हा प्रकल्प राज्याला जागतिक मानव संसाधन केंद्र म्हणून बळकटी देणारा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला डॉ. रशीद बशीर (व्हाइस चान्सलर, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स आणि डीन, ग्रेंजर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग), प्रदीप खन्ना (असोसिएट व्हाइस चान्सलर, कॉर्पोरेट रिलेशन्स), डॉ. जर्मन बोल्लेरो (डीन, कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल, कंझ्युमर अँड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस), डॉ. कोलीन मर्फी (असोसिएट चान्सलर आणि व्हाइस प्रोव्होस्ट, ग्लोबल अफेयर्स) तसेच अश्विन दामेरा उपस्थित होते.
 जागतिक दर्जाच्या शिक्षणाकडे निर्णायक पाऊल
या भेटीमुळे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्राला जागतिक सहकार्याची नवी दिशा मिळणार असून, संशोधन, नवोन्मेष आणि कौशल्यविकास यांना चालना मिळेल. महाराष्ट्र ‘ग्लोबल एज्युकेशन पॉवरहाऊस’ म्हणून उदयास येत असल्याचे या ऐतिहासिक संवादातून स्पष्ट झाले.