Home Breaking News 20 दिवसांच्या अथक तपासानंतर चाकण उत्तर पोलिसांकडून अज्ञात तरुणाच्या खुनाचा उलगडा; आईसह...

20 दिवसांच्या अथक तपासानंतर चाकण उत्तर पोलिसांकडून अज्ञात तरुणाच्या खुनाचा उलगडा; आईसह तिघांना अटक

66
0
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीच्या खुनाच्या प्रकरणाचा अवघ्या 20 दिवसांत यशस्वी उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेला तपास आरोपींपर्यंत पोहोचवून पोलिसांनी तिघांना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे.
दि. 11 जानेवारी 2026 रोजी मौजे बिरदवडी गावच्या स्मशानभूमीच्या मागील ओढ्यालगत असलेल्या मोकळ्या आणि निर्मनुष्य जागेत एका अंदाजे 25 ते 30 वर्षे वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सदर इसमाचा चेहरा दगडाने ठेचून पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता, तसेच डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र, मोबाईल किंवा वैयक्तिक वस्तू नसल्याने मृताची ओळख पटविणे मोठे आव्हान होते.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. 47/2026 बी.एन.एस. कलम 103 (1) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील कंपन्यांमधील कामगार, स्थानिक नागरिक यांची चौकशी केली. मृताचे फोटो छापून परिसरात भित्तीपत्रके लावण्यात आली. तसेच सोशल मिडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ओळख पटवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
तपासादरम्यान घटनास्थळी मिळालेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे एका मोपेड गाडीचा धागा पोलिसांना सापडला. गाडी मालकाकडे चौकशी केली असता त्याने सदर गाडी आपला मित्र निखील नानासाहेब चव्हाण यास वापरण्यास दिल्याचे सांगितले. पोलिसांनी निखील यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता संपूर्ण कट उघडकीस आला.
मृताचे नाव मुंजा धोंडीबा नरहिरे (वय 25 वर्षे, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी निखील चव्हाण याच्या आई उषा चव्हाण हिचे मयताशी अनैतिक संबंध होते. त्यावरून वाद होत असल्याने आणि मयत तिचा सतत त्रास देत असल्याने आरोपींनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. निखील व त्याचा मित्र स्वप्नील पारधी यांनी मयताला गंगाखेड येथून चाकण येथे बोलावून घेतले. दारू पिण्याच्या बहाण्याने स्मशानभूमीजवळील निर्जन जागी नेऊन कोयत्याने वार करून निर्दयीपणे खून केला. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून सर्व वस्तू काढून घेतल्या.
सतत 20 दिवस अहोरात्र तपास करून कोणताही ठोस पुरावा नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास, माहिती संकलन व गुप्त पाळत ठेवून या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अप्पर आयुक्त बसवराज तेली, मा. अप्पर आयुक्त सारंग आव्हाड, मा. पोलीस उप आयुक्त मारुती जगताप, सहा. पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक विनोद पाटील तसेच तपास पथकातील तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सपोफौ सुनिल शिंदे, पो.ह. / भैरोबा यादव, प्रितम ढमढेरे, योगेश कोळेकर, पो.शि./ शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार, सुमित जगझाप यांनी केला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हेगारांना अटक झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.