पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पिंपरी येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या डेअरी फार्म उड्डाणपुलाला ‘लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्यात यावे, अशी ठाम आणि भावनिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांकडून करण्यात आली आहे.
ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने नगरसेवक डब्बू आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या शिल्पकारांना आदरांजली
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे मा. अजितदादा पवार साहेब यांनी शहराच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी दूरदृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराने झपाट्याने प्रगती केली आणि राज्यातील अग्रगण्य औद्योगिक व नागरी महानगरांमध्ये आपले स्थान निर्माण केले.
विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान
अजितदादा पवार साहेब यांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा योजना, रस्ते व वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरी पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था, तसेच महापालिकेची आर्थिक शिस्त आणि बळकटीकरण यासाठी घेतलेले निर्णय आजही शहराच्या विकासाचा पाया ठरत आहेत. त्यांनी आखून दिलेल्या धोरणांमुळे महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली, तसेच शहराला स्वतंत्र आणि सशक्त नागरी ओळख मिळाली, असेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
उड्डाणपुलाच्या नामकरणातून कायमस्वरूपी स्मृती
डेअरी फार्म उड्डाणपूल हा पिंपरी शहरातील एक महत्त्वाचा वाहतूक दुवा ठरणार असून, या उड्डाणपुलाला अजितदादा पवार साहेबांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी जपली जाईल, तसेच भावी पिढ्यांना त्यांच्या योगदानाची प्रेरणा मिळेल, अशी भावना राष्ट्रवादी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
तातडीने प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी
महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेऊन तो तातडीने मंजूर करावा व संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी ठोस मागणी डब्बू आसवानी यांनी प्रभाग क्रमांक २१ मधील सर्व नगरसदस्यांच्या वतीने केली आहे. या मागणीला शहरातील नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात याबाबत महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.