Home Breaking News तळोजात ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण;...

तळोजात ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण; वकिलांसाठी ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

62
0
तळोजा | नवी मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने तळोजा, नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेले देशातील पहिले ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) हे वकिलांसाठी एक ऐतिहासिक आणि दिशादर्शक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अत्याधुनिक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ज्या पद्धतीने न्यायमूर्तींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी आहे, त्याच धर्तीवर वकिलांसाठी प्रशिक्षण अकॅडमी का नसावी, हा प्रश्न आज बार कौन्सिलने कृतीतून सोडवला आहे.” कायद्याचे शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील कोर्ट क्राफ्ट यामधील दरी भरून काढण्यासाठी हे केंद्र मोलाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी नमूद केले.
या केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर यांनी भूषविले. या वेळी मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती न्या. रेवती मोहिते-डेरे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ॲड. अनिल सी. सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता ॲड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नवोदित वकिलांना आधुनिक कायदेविषयक प्रशिक्षण, संशोधनाची संधी, तंत्रज्ञानाधारित शिक्षण तसेच व्यावसायिक कौशल्यविकासासाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या विचारांना पुढे नेणारे हे केंद्र देशातील कायदेव्यवस्थेसाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.