परवापर्यंत ज्यांच्या सहवासात हसणं, चर्चा, निर्णय आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची स्वप्नं होती, त्या सहवासाला आज कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करताना मन असंख्य आठवणींच्या कल्लोळात हरवून गेलं, अशा भावनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
“दादांना आदरांजली वाहताना त्यांच्यासोबत घालवलेले क्षण, संघर्षाचे दिवस, निर्णयांचे क्षण आणि जनतेसाठी केलेले अथक प्रयत्न डोळ्यांसमोरून सरकून गेले,” असे सांगत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांसोबतचा राजकीय प्रवास हा केवळ सत्तेपुरता मर्यादित नव्हता, तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठीचा तो एक जिव्हाळ्याचा आणि जबाबदारीचा प्रवास होता, असेही त्यांनी नमूद केले.
“दादा, तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आजवर तुमच्यासोबत काम करत आलो. यापुढे तुमची उणीव भरून काढण्यासाठी, तुमचे विचार आणि विकासाची दृष्टी जपत, अधिक जबाबदारीने काम करत राहू,” असा निर्धार व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी दादांच्या स्मृतींना नमन केले.
अजितदादा पवार हे प्रशासनावर मजबूत पकड असलेले, निर्णयक्षम आणि तळागाळातील जनतेशी थेट नाते जपणारे नेते होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असली, तरी त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांची कार्यशैली आणि जनतेवरील अपार प्रेम हेच पुढील पिढीसाठी प्रेरणास्थान राहील, अशा भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होत्या.