महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज बारामती, पुणे येथे देशपातळीवरील राजकीय नेतृत्व उपस्थित राहिले. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नितीन नबीन यांनी बारामतीत दाखल होत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील विविध मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर शोकमय वातावरणाने व्यापलेला होता. अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सर्वांनीच अधोरेखित केली. त्यांच्या कार्यशैलीतील निर्णयक्षमता, प्रशासनावरची पकड आणि जनतेशी असलेला थेट संवाद याबद्दल उपस्थित मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. विविध पक्षांचे नेते एकत्र येत राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन श्रद्धांजली अर्पण करताना दिसले.
अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. पोलीस, आरोग्य आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. राज्य आणि देशभरातून आलेल्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे बारामती आज महाराष्ट्राच्या शोकाकुल इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार ठरली.