Home Breaking News शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

52
0
पुणे : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालय, पुणे येथे अत्यंत शिस्तबद्ध, भव्य आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी मा. ना. श्री. अजित आशाताई आनंदराव पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकावताच संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि अभिमानाने भारावून गेला.
या सोहळ्यास श्री. जितेंद्र डूडी (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, पुणे, श्री. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.), विभागीय आयुक्त, पुणे, पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, तसेच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी, अधिकारी-कर्मचारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय सेवेसाठी मिळालेली राष्ट्रपती सुधार पदके लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य राखीव पोलीस बल, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. हा क्षण पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरला.
प्रजासत्ताक दिनाच्या भव्य परेड संचलनामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांनी परेड कमांडर तर राखीव पोलीस निरीक्षक श्री. सोपान देवरे यांनी सेकंड इन कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली.
राज्य राखीव पोलीस बल, पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस, पुणे ग्रामीण, लोहमार्ग पोलीस, होमगार्ड, वन विभाग, वाहतूक शाखा, आर.सी.पी., पोलीस वाद्यवृंद, श्वान पथक, मोटार सायकल रायडर्स, डायल ११२, वज्र, वरूण वॉटर कॅनन, अग्निशमन दल, अत्याधुनिक रुग्णवाहिका, पीएमआडी वाहन, तसेच विविध शासकीय व सामाजिक संदेश देणारे चित्ररथ अशा अनेक पथकांनी शिस्तबद्ध संचलनातून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या नऊ प्लाटून्स, एनसीसी व विविध नामांकित शाळांतील मुला-मुलींच्या संचलनाने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. लहान वयातच राष्ट्रभक्ती, शिस्त आणि देशसेवेची प्रेरणा देणारे हे संचलन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अत्यंत प्रभावीपणे पोलीस अंमलदार दत्तात्रय निकम, सचिन देवडे, आकाशवाणी पुणेच्या श्रीमती शिल्पा देशपांडे व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार श्री. सिताराम नरके यांनी केले. हा सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता संविधान, कर्तव्य, शिस्त, एकता आणि राष्ट्रप्रेम यांचे सशक्त दर्शन घडवणारा उत्सव ठरला, अशी भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.