ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषिक २०२६’ या भव्य कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शारदानगर येथील अटल इन्क्यूबेशन सेंटरला सदिच्छा भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान संस्थेचे चेअरमन राजेंद्रकाका पवार यांनी ट्रस्टच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देत कृषी क्षेत्रातील नवकल्पना, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाधारित शेतीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
यावेळी बोलताना राजेंद्रकाका पवार यांनी सांगितले की, आजोबा स्व. आप्पासाहेब पवार आणि आदरणीय पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी दूरदृष्टीने आणि सातत्याने अपार काम केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी उभ्या केलेल्या संस्थात्मक रचनेचा आजही मोठा लाभ होत आहे. शिक्षण, संशोधन, आधुनिक शेती, दुग्धव्यवसाय आणि उद्योजकता विकास या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्या योगदानाचा ठसा आजही स्पष्टपणे जाणवतो.
कृषी नवोपक्रमांना चालना
अटल इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून कृषी स्टार्टअप्स, नव्या कल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे. शेतकऱ्यांना केवळ उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेशी थेट जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
आठवणींना उजाळा
भेटीदरम्यान राजेंद्रकाका पवार यांनी स्व. आप्पासाहेब पवार आणि पवार साहेबांच्या फोटोंना पाहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल करणारी ही परंपरा पुढील पिढ्यांनीही जपावी, असा भावनिक संदेश यावेळी व्यक्त झाला. ‘कृषिक २०२६’ च्या माध्यमातून शेती, संशोधन आणि उद्योजकतेचा संगम घडवून आणण्याचा हा उपक्रम शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.