पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याची विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून औपचारिक सुरूवात झाली. या वेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली.
पहिल्या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर असून हा टप्पा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातील घाट-वळण रस्त्यांवरून जाणारा असल्याने सायकलपटूंना वेग, सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्याचा कस लागला. निसर्गरम्य परिसरातून मार्गक्रमण करत माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी सुमारे ४ वाजता या टप्प्याचा समारोप झाला.





