Home Breaking News कृषी, शिक्षण व समाजसेवेचा गौरवमय संगम – मा. कृष्णराव इंगळे यांच्या अमृत...

कृषी, शिक्षण व समाजसेवेचा गौरवमय संगम – मा. कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यासह भव्य सातपुडा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कृष्णरावजी इंगळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळा व भव्य सातपुडा कृषी प्रदर्शनाला आज उपस्थित राहून उपस्थित जनसमुदायाला संबोधित करण्यात आले. हा सोहळा केवळ एका व्यक्तीच्या आयुष्याचा गौरव नव्हता, तर शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामीण विकासाच्या सातत्यपूर्ण कार्याचा उत्सव ठरला.
सातपुडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे कृष्णरावभाऊ हे आजही तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकारलेले दिसते. त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळाली आहे. त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि समाजसेवेतील निरंतर कार्यासाठी यावेळी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सातपुडा कृषी प्रदर्शनात आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील नव्या संकल्पना, शेतकरी उपयोगी यंत्रसामग्री, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण तसेच मार्गदर्शनपर स्टॉल्स यांचा समावेश करण्यात आला होता. या प्रदर्शनामुळे शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीची दिशा, उत्पादन वाढीचे मार्ग आणि बाजारपेठेतील संधी यांची माहिती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शेतीला केवळ उदरनिर्वाहाचे साधन न मानता, ती समृद्धीचा मार्ग कसा ठरू शकते, याचे हे प्रदर्शन प्रभावी उदाहरण ठरले.
या भव्य आयोजनाबद्दल सातपुडा परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागात शिक्षण आणि कृषी या दोन्ही क्षेत्रांना एकत्रितपणे चालना देणारा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार श्री. मुकुल वासनिक जी, राज्याचे माजी कृषी व महसूल मंत्री श्री. बाळासाहेब थोरात, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद पठाण, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. राहुल बोन्द्रे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कृष्णरावभाऊंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्यातून समाजाला मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख केला. हा सोहळा म्हणजे एका व्यक्तीच्या जीवनकार्याचा गौरव तर होताच, पण त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्राच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला आश्वासक संदेशही ठरला.