झ्युरिक, स्वित्झर्लंड : परदेशातही मराठी संस्कृतीची ओळख आणि गौरव जपणाऱ्या मराठी बांधवांनी झ्युरिक येथे महाराष्ट्राची परंपरा जागवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान, येथील मराठी माता-भगिनींनी लेझीम खेळत त्यांचे पारंपरिक पद्धतीने, उत्स्फूर्त आणि जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर साकारलेले हे दृश्य परदेशी भूमीवर मराठमोळ्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवणारे ठरले.
या आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. परदेशात राहत असूनही आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि परंपरेशी नाते जपणाऱ्या मराठी समाजाची ही भावना पाहून मुख्यमंत्री फडणवीस भारावून गेले. त्यांनी स्वित्झर्लंडमधील मराठी बांधवांचे मनापासून आभार मानत, “इथे मिळालेलं प्रेम, आपुलकी आणि सन्मान हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. परदेशातही महाराष्ट्राची ओळख जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा मला अभिमान आहे,” असे भावनिक उद्गार काढले.
लेझीम हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. युद्धकौशल्य, शौर्य आणि एकतेचे प्रतीक असलेल्या या कलेचे सादरीकरण झ्युरिकसारख्या युरोपियन शहरात होताना पाहणे, हे मराठी अस्मितेचे जागतिक स्तरावर झालेले दर्शन होते. या स्वागतामुळे केवळ एका नेत्याचा सन्मान झाला नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि ओळख आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधिक ठळकपणे अधोरेखित झाली.
स्वित्झर्लंडमधील मराठी समाज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असून, आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि संस्कारांच्या जोरावर भारताची प्रतिमा उज्ज्वल करत आहे. त्यांच्या या प्रेमळ स्वागतामुळे “मराठी माणूस कुठेही गेला तरी तो आपली माती विसरत नाही” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ही भेट आणि स्वागत कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचा, जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या प्रभावाचा आणि मराठी समाजाच्या एकात्मतेचा गौरव करणारा ठरला.