उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय हालचालींमध्ये शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नगरसेवकांचे मनापासून आभार मानले आणि उल्हासनगरच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी स्थिर व सक्षम नेतृत्वाची गरज आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
सुरेखा सोनवणे आणि विकास खरात यांनी सांगितले की, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शहराच्या प्रगतीसाठी सकारात्मक राजकारण आवश्यक असून, त्याच भूमिकेतून हा पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या घडामोडीमुळे उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात स्थिर आणि विकासाभिमुख प्रशासनाची दिशा निश्चित होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.