मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार दीपक राजाराम सावंत यांनी शाखा क्रमांक १११ मधून दणदणीत विजय मिळवला आहे. तब्बल १२,२०६ मतांच्या भरघोस फरकाने त्यांनी विजय संपादन करत परिसरात शिवशक्तीचा झेंडा फडकावला आहे.
या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि “शिवशक्तीचा विजय असो” या घोषणांत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. नागरिकांनी दिलेला हा कौल म्हणजे लोकशाहीवरील विश्वास आणि जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब असल्याचे बोलले जात आहे.
विजयानंतर दीपक सावंत यांनी सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. “जनतेने दाखवलेला विश्वास मी कधीही डळमळू देणार नाही. हा विजय माझा नसून प्रत्येक मतदाराचा आहे. परिसराच्या विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आणि न्यायासाठी मी सदैव तत्पर राहीन,” असे भावनिक शब्दांत त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या युतीने एकजूट दाखवत मजबूत लढत दिली. या युतीच्या बळावर मतदारांनी स्पष्ट कौल देत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून, विचारांचा, संघटनेचा आणि लोकशक्तीचा विजय असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
स्थानिक विकास, नागरी सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी हा विजय नवे पर्व ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. शाखा १११ मधील हा निकाल येत्या काळातील राजकीय समीकरणांवरही मोठा प्रभाव टाकणारा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.