Home Breaking News “जय जवान जय किसान”चा संदेश देणारे लाल बहादूर शास्त्री हे देशासाठी दीपस्तंभ...

“जय जवान जय किसान”चा संदेश देणारे लाल बहादूर शास्त्री हे देशासाठी दीपस्तंभ – उप आयुक्त अण्णा बोदडे

पिंपरी – “जय जवान जय किसान” ही क्रांतिकारी घोषणा देत संपूर्ण देशाला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे केवळ थोर स्वातंत्र्यसैनिकच नव्हे, तर मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक होते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उप आयुक्त अण्णा बोदडे बोलत होते.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.
उप आयुक्त बोदडे म्हणाले की, लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन अत्यंत साधेपणाचे होते. वैयक्तिक आयुष्यातील नम्रता आणि सार्वजनिक जीवनातील दृढता हे त्यांचे प्रमुख गुण होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवा, राष्ट्रनिर्माण आणि सामान्य माणसाच्या हितासाठी समर्पित केले. कठीण परिस्थितीतही त्यांनी देशाच्या हितासाठी ठाम निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला.
“नम्रता, प्रामाणिकपणा, दृढ विश्वास आणि निर्णयक्षमता यामुळेच शास्त्रीजी जनमानसात लोकप्रिय झाले. आजच्या पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेसाठी कार्य करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असेही त्यांनी सांगितले.
हा कार्यक्रम केवळ स्मरणाचा नव्हता, तर शास्त्रीजींच्या विचारांचे पुनरुज्जीवन करणारा प्रेरणादायी क्षण ठरला. त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.