Home Breaking News प्रभाग ८७ मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार; आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये...

प्रभाग ८७ मध्ये महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार; आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८७ मध्ये प्रचाराला वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती पूजा विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रचारात युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना विजयाचा ठाम विश्वास दिला.
या वेळी स्थानिक आमदार श्री. वरुण सरदेसाई, पक्षाचे पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत महाविकास आघाडीच्या काळात मुंबईत झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. “मुंबईचा विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता, तो प्रत्येक नागरिकाच्या जीवनात प्रत्यक्ष दिसायला हवा. पारदर्शक कारभार, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे, हेच आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
प्रचारादरम्यान त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेवर, आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी या मुद्द्यांवर विशेष भर दिला. “प्रभाग ८७ मधील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद पूजा महाडेश्वर यांच्यात आहे. त्यांना विजयी करून या प्रभागाला सक्षम, संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्व द्या,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
उमेदवार श्रीमती पूजा महाडेश्वर यांनीही नागरिकांचे आभार मानत, “हा लढा केवळ निवडणुकीचा नाही, तर आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भवितव्याचा आहे. विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगतीसाठी मी अखंड प्रयत्न करेन,” असा विश्वास व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून, संपूर्ण प्रभागात महाविकास आघाडीच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, प्रभाग ८७ मध्ये परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.