पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीने प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, विकासनगर–किवळे परिसरात भाजप पॅनलचा प्रभावी झंझावात पाहायला मिळत आहे. शिस्तबद्ध नियोजन, संघटित कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासकेंद्री मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे युतीचा जनसंपर्क अधिक मजबूत होत आहे.
भाजप–आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतपाळे (अ गट), शिल्पा राऊत (ब गट), माजी नगरसेविका संगिता भोंडवे (क गट) आणि दिपक भोंडवे (ड गट) यांनी विकासनगर, किवळे गावठाण, मुख्य रस्ते तसेच अंतर्गत भागांत पदभ्रमण करत घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. “विकास हीच आमची ओळख आणि विश्वास” हा संदेश देत उमेदवारांनी नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला.
या पदयात्रेदरम्यान गोपाळ तंतपाळे, राजेंद्र भोंडवे, अमोल भोंडवे, नवनाथ राऊत, अमोल राऊत, रघुवीर शेलार यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांबाबत नागरिकांनी आपली मते व अपेक्षा मांडल्या.
उमेदवारांनी गेल्या काही वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखाली प्रभागात आणि शहरात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. स्मार्ट रस्ते, सुधारित पाणीपुरवठा योजना, स्वच्छतेत सुधारणा, आरोग्य केंद्रांची उभारणी, उद्याने व सार्वजनिक सुविधांचा विकास यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात अधिक नियोजनबद्ध, लोकाभिमुख आणि पारदर्शक विकास करण्याचा निर्धार त्यांनी नागरिकांसमोर मांडला.
विकासाच्या मुद्द्यावर मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, “काम करणाऱ्यांनाच संधी” ही भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे प्रभागात भाजप पॅनलबाबत विश्वासाचे वातावरण तयार होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. विकासनगर–किवळे भागात भाजप–आरपीआय युतीचा प्रचार दिवसेंदिवस अधिक प्रभावी ठरत असून, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा झंझावात आणखी वेग घेण्याची चिन्हे आहेत.