Home Breaking News दरे येथील श्री क्षेत्र उत्तेश्वर यात्रेला भक्तीचा महासागर; ग्रामदैवताच्या दर्शनाने वातावरण भक्तिमय

दरे येथील श्री क्षेत्र उत्तेश्वर यात्रेला भक्तीचा महासागर; ग्रामदैवताच्या दर्शनाने वातावरण भक्तिमय

59
0
दरे, #सातारा | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या मूळगावी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री क्षेत्र उत्तेश्वराच्या वार्षिक यात्रेला मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली. या पवित्र यात्रेनिमित्त उपस्थित राहून श्री उत्तेश्वराचे सहकुटुंब विधिवत पूजन करत मनोभावे दर्शन घेण्यात आले.
या यात्रेदरम्यान संपूर्ण दरे गाव भक्तीरसात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. पारंपरिक वेशभूषा, धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि हरिनामाच्या गजरामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नूषा वृषाली श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच दरे गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होत गावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
श्री क्षेत्र उत्तेश्वराची यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक असून दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यात्रेमुळे गावातील सांस्कृतिक परंपरा जपल्या जात असून नव्या पिढीला आपल्या धार्मिक वारशाची ओळख होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.