Home Breaking News युवकांनी आधुनिक कलांना विकसित करण्याचे काम करावे-उपसंचालक उदय जोशी

युवकांनी आधुनिक कलांना विकसित करण्याचे काम करावे-उपसंचालक उदय जोशी

पुणे युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याच्यादृष्टीने 29 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 सा कालावधीत ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, निगडी येथे आयोजित  सन 2025-26 या वर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव यशस्वीपणे संपन्न झाले.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह निगडी येथे 31 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या पारितोषक वितरण समारंभासाठी  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक उदय जोशी,  उपसंचालक माणिक पाटील,  उपसंचालक युवराज नाईक,  सहायक संचालक मिलिंद दिक्षीत, सहायक संचालक चंद्रशेखर साखरे,  जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे, तसेच जय मल्हार मालिकेमधील म्हाळसाची भूमिका साकारलेली प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
श्री. जोशी म्हणाले, कलाकारांनी  विकसित भारत 2047 च्या अनुषंगाने वाटचाल करुन आपापल्या अंगी असलेल्या आधुनिक कलांना विकसित करण्याचे काम करावे. क्रीडा विभागाकडून युवकांसाठी धोरण तयार करण्यात येत असून यामध्ये युवकांना केंद्रबिंदु ठेवून तयार करण्यात येत आहे. यामध्ये युवकांचे मतांचा स्विकार करण्यात येईल. नुकताच दिव्यांग महिलांनी विश्वचषकाचा अंतिम सामना जिकूंन विश्वविजेते पदकावर नाव कोरले आहे.  तुमच्याकडे असलेल्या कलांना जागतिक पातळीवर नेण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
जिंकलेल्या कलाकरानी हुरळून न जाता राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करावी व पराभूत झालेल्या उमेद न होता नव्याने तयारी करावी. तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवांकरिता निवड झालेल्या युवक युवतींना श्री. जोशी यांनी शुभेच्छा  दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. लकडे यांनी दोन दिवस कलाकारांनी सादरीकरण केल्याची माहिती दिली. कलाकारांचे व परिक्षकांनी सादरीकरण केलेल्या कलाकरांचे जीव ओतून परिक्षण केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. यावेळी अभिनेत्री श्रीमती हांडे यांनी कलाकारांशी जय मल्हार मालिकेतील अनुभवाची माहिती देण्यासोबतच त्यांनी कलेबरोबर इतर आवडीच्या क्षेत्रातही चांगली कामगिरी करावी, असे म्हणाल्या.
स्पर्धेचा निकाल :
30 व 31 डिसेंबर 2025 या कालावधीत लोकगीत, लोकनृत्य, कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व, काव्यलेखन व विज्ञान प्रदर्शन या विविध बाबींमध्ये युवक व युवतींनी सहभाग घेवून आपल्या कला सादर केल्या. या स्पर्धेकरिता परिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे: वक्तृत्व-डॉ. अंजना देवकाते-खताळ, सारिका गवळी, हितेंद्र सोमाणी,  कथालेखन- विजय हरिभाऊ लोंढे, प्रमिला वेडगे, प्रा. जुबेर पटेल, चित्रकला सुनिल कुलकर्णी, राहुल बळवंत, परमजित पतंगे,  काव्यलेखन कल्याण राक्षे, प्रतिमा काळे, बाबासाहेब शेख, लोकगीत- बाळासाहेब चव्हाण, सागर रोकडे, डॉ. सुनिता जगदाळे, लोकनृत्य- बाळसाहेब चव्हाण, डॉ. सानवी जेठयाणी, वैभव सतरंगे, डॉ. सुनिता जगदाडे, विज्ञान प्रदर्शन डॉ. संदिपान नरोटे, डॉ. धीरज ढाणे, डॉ. बालाजीत शेट्टी यांनी परिक्षक म्हणून कामकाज केले. विभागनिहाय स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे: वक्तृत्व स्पर्धा-दिपाली सोनी प्रथम क्रमांक नाशिक, व्दितीय क्रमांक: प्राप्ती केजकर  लातूर, तृतीय क्रमांक वैष्णवी हगवणे,  मुंबई.  कथा लेखन- प्रथम क्रमांक: वैशाली लांडे अमरावती, व्दितीय क्रमांक राजकन्या फावडे लातूर, तृतीय क्रमांक अक्षता जाधव कोल्हापूर,  चित्रकला- प्रथम क्रमांक सचिन घंटे पुणे, व्दितीय क्रमांक मुकेश अढाउ, अमरावती, तृतीय क्रमांक रजनी गाठीबांधे नागपूर. काव्य लेखन प्रथम क्रमांक संदिप भामरे नाशिक, व्दितीय क्रमांक साक्षी सुराणा पुणे, तृतीय क्रमांक सादअली शाकी अली सय्यद नागपूर. लोकगीत- प्रथम क्रमांक कोल्हापूर , अमरावती व्दितीय क्रमांक, पुणे तृत्तीय क्रमांक. लोकनृत्य- लातूर प्रथम क्रमांक, कोल्हापूर व्दितीय क्रमांक, मुंबई व पुणे तृतीय क्रमांक.  विज्ञान प्रदर्शन- मुंबई प्रथम क्रमांक, नाशिक व्दितीय क्रमांक, पुणे तृतीय क्रमांक.
विभागाच्या स्पर्धकांनी प्रथम, व्दितीय व तृतीय असे अनुक्रमे प्राविण्य प्राप्त केले आहे. वक्तृत्व, कथालेखन, कवितालेखन, विज्ञान प्रदर्शन व चित्रकला या बाबींकरिता प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाकरिता अनुक्रमे रुपये 5, 3 व 2 हजार रुपये तसेच लोकगीत, लोकनृत्य या बाबींकरिता प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाकरिता अनुक्रमे रुपये 15, 12 व 10 हजार असे पारितोषिक रक्कम व सम्मानचिन्हे देवून युवक व युवतींना सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक, मुंबई विभागातून 312 युवक युवती वयोगट 15 ते 29 वर्षे या वयोगटातील युवक युवती सहभागी झाले होते.  या स्पर्धेतील विजयी संघ दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सव  8 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित होणार आहे. या महोत्सवाकरिता महाराष्ट्र राज्याचा लोकगीत, लोकनृत्य, चित्रकला, वकृत्व, कवितालेखन या बाबीतील प्रथम क्रमांक प्राप्त युवक व युवती प्रतिनिधीत्व करणार आहेत.