पिंपरी, पुणे : पिंपरी गाव, अशोक थिएटर, जिजामाता हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २१ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज अधिकृतरीत्या दाखल केला. अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण होते. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी उषाताई वाघेरे यांना पाठिंबा दर्शवला.
उषाताई वाघेरे या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या अनुभवी नेत्या असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासाभिमुख निर्णय घेण्यात आले असून त्याचा थेट फायदा पिंपरी गाव व परिसरातील नागरिकांना झाला आहे.
पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पूल, डेअरी फार्म परिसरातील रेल्वे उड्डाणपूल, तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा सुधारणा, ड्रेनेज व्यवस्था, उद्याने व सार्वजनिक सुविधा मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या विकासकामांमुळे परिसरातील वाहतूक सुलभ झाली असून नागरी जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे.
उषाताई वाघेरे यांची विकासाभिमुख भूमिका, प्रशासकीय अनुभव, आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेला थेट संवाद हे त्यांच्या उमेदवारीचे मोठे बलस्थान मानले जात आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे विशेष लक्ष लागले आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून प्रभाग २१ मध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात झाली असून, उषाताई वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक रणधुमाळीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक विकास, महिलांचे प्रश्न, पायाभूत सुविधा आणि पारदर्शक प्रशासन हे मुद्दे घेऊन त्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.