पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करीत असलेल्या या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्राहकांचे हक्क, संरक्षण आणि फसवणूक प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे, सदस्या ॲड. अनिता गवळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ग्राहक हक्कांविषयी मार्गदर्शन करताना डिजिटल युगातील आव्हाने व संधी यावर प्रकाश टाकला.
यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर म्हणाले की, ग्राहकांची फसवणूक रोखणे, त्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करणे तसेच फसवणूक झाल्यास तक्रार निवारण यंत्रणेची माहिती देणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी प्रशासनामार्फत विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष विलास लेले यांनी ग्राहकांचे हक्क आणि हित जपणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी सजग राहणे आवश्यक असून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यामार्फत ग्राहकांना मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे यांनी या वर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना ‘जलद, सुलभ डिजिटल न्यायाकडे वाटचाल’ अशी असल्याचे स्पष्ट केले. ‘ग्राहक संरक्षण अधिनियम 2019’ हा नागरिकाभिमुख कायदा असून त्याची व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. नागरिकांची फसवणूक झाल्यास 1915 हेल्पलाईन क्रमांक, 8800001995 चॅटबॉट किंवा e-jagriti.gov.in या संकेतस्थळावर तक्रार दाखल करता येते. अधिकाधिक नागरिकांनी या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध विभागांनी उभारलेल्या माहिती व सेवा स्टॉल्सना मान्यवरांनी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या स्टॉल्सद्वारे नागरिकांना आवश्यक सेवा, तक्रार नोंद प्रक्रिया व ग्राहक हक्कांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. एकूणच, राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यास उपयुक्त ठरला.