Home Breaking News “पुरस्कार मिळो वा न मिळो, कला उत्सवातील प्रत्येक विद्यार्थी आज विजेता आहे”...

“पुरस्कार मिळो वा न मिळो, कला उत्सवातील प्रत्येक विद्यार्थी आज विजेता आहे” – राष्ट्रीय कला उत्सव २०२५ च्या समारोपात संजय कुमार यांचे प्रेरणादायी प्रतिपादन

पुणे | दि. २4 — राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित करण्यात आले असून, त्याच धोरणाला अनुसरून आयोजित करण्यात आलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि प्रेरणा देणारा ठरला आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी केले. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे पार पडलेल्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते.
संजय कुमार म्हणाले, “काही विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाले असले तरी या उत्सवात सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी आज जिंकलेला आहे. कला ही केवळ स्पर्धा नसून आत्मअभिव्यक्ती, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे.” त्यांनी या भव्य आयोजनासाठी महाराष्ट्र शासन, एनसीईआरटी आणि यशदा यांचे विशेष अभिनंदन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून विद्यार्थी कल्पकतेच्या माध्यमातून शिकतील, असा सल्लाही त्यांनी दिला. या समारंभाला केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. आनंदराव पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी, एससीईआरटीचे संचालक श्री. राहुल रेखावार, एनसीईआरटीच्या विभागप्रमुख प्रा. ज्योत्स्ना तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते. एनसीईआरटी, नवी दिल्लीद्वारे २०१५ पासून दरवर्षी या राष्ट्रीय कला उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
यावेळी बोलताना अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील म्हणाले, “एकमेकांच्या कला आणि संस्कृतीची देवाणघेवाण म्हणजेच ‘एक भारत श्रेष्ठ भारत’. या मंचावर साकारलेली प्रतिभा भविष्यात जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्वल करेल.”
प्रधान सचिव रनजीतसिंह देओल यांनी सांगितले की, “दिल्लीबाहेर प्रथमच इतक्या व्यापक आणि सुंदर पद्धतीने हा कला उत्सव साकार झाला. हा मंच विद्यार्थ्यांसाठी केवळ कार्यक्रम नव्हे, तर भविष्यासाठीची संधी आहे.”
एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी कलेला संस्कृतीचा प्राण मानत सांगितले की, शासनाकडून अशा उपक्रमांना मिळणारे प्रोत्साहन आनंददायी आहे. तसेच या उत्सवात सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी कलाकार एनसीईआरटीसोबत आयुष्यभर जोडला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी संगीत गायन (समूह), संगीत वादन, तालवाद्य यांसह विविध १२ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. कला उत्सवाच्या माध्यमातून देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि संस्कृती एकमेकांशी जोडल्या गेल्या असल्याचे शर्वरी बॅनर्जी यांनी नमूद केले. उत्सवाची वैशिष्ट्ये सांगणारी माहितीपट चित्रफीतही यावेळी सादर करण्यात आली.
राष्ट्रीय कला उत्सव २०२५ हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने दि. २० ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत यशदा, पुणे येथे पार पडला. देशभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेची समृद्ध देवाणघेवाण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूपा बने आणि प्रिया मोर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियंवदा तिवारी यांनी केले.