Home Breaking News अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी; सकाळी मेल प्राप्त, सहा मजली इमारतीची...

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी; सकाळी मेल प्राप्त, सहा मजली इमारतीची सखोल तपासणी

73
0
हिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आज सकाळी सुमारे नऊ वाजता प्राप्त झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीनंतर तात्काळ प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
धमकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका टाळण्यासाठी दोन स्वतंत्र बॉम्बशोधक व नाशक पथकांद्वारे (BDDS) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची सखोल तपासणी करण्यात आली. प्रत्येक मजला, कार्यालयीन खोल्या, पार्किंग परिसर, जिने आणि परिसरातील मोकळ्या जागांची बारकाईने पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे प्राथमिक स्वरूपात स्पष्ट झाले आहे.
या घटनेमुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला. अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, हा धमकीचा मेल नेमका कुठून आणि कोणाच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलमार्फत सखोल तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे (सो.) यांनी दिली. मेलची तांत्रिक माहिती, IP अ‍ॅड्रेस, सर्व्हर लोकेशन आणि संबंधित डिजिटल पुरावे गोळा करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या शासकीय इमारतींवरील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.