भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविजेतेपद पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संघातील खेळाडूंचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या या विशेष समारंभात देशाचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी खेळाडूंना संबोधित करताना सांगितले की, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी आपल्या जिद्दीने, चिकाटीने आणि अपार मेहनतीने भारताचे नाव जगभरात उज्ज्वल केले आहे. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहून अंतिम सामन्यात निर्णायक विजय मिळवत भारताचे वर्चस्व सिद्ध झाले. इतिहासात दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेटचे पहिले विश्वविजेते म्हणून भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले असून हा विजय कायम स्मरणात राहील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या गौरव सोहळ्याला क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उगले, संघाची कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार व महाराष्ट्राची लेक गंगा कदम, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडियाचे चेअरमन के. जी. महंतेश, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह संघातील सर्व खेळाडू उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या यशामागे प्रत्येक खेळाडूची स्वतःची संघर्षकथा आहे. अनेक अडचणी, मर्यादा आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यामुळेच हे यश शक्य झाले. “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती” हे वाक्य या संघाने प्रत्यक्षात उतरवले असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्य शासनाच्या वतीने खेळाडूंना सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही देताना मुख्यमंत्री म्हणाले की, सरावासाठी येणाऱ्या अडचणी दूर करणे, आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी तसेच आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. खेळाडूंना स्वतंत्र व कायमस्वरूपी सराव मैदान, आधुनिक सुविधा आणि प्रशिक्षणासाठी क्रीडा आयुक्तांमार्फत सकारात्मक चर्चा करून लवकरच योग्य निर्णय घेतले जातील. कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण त्यांच्या क्रीडा प्रगतीस अडथळा ठरू नये, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात सध्या खेळ आणि खेळाडूंना मिळणारे महत्त्व वाढत असल्याचे मत व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूर्वी खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची मानसिकता कमी होती; मात्र आता ही परिस्थिती बदलत असून सरकारकडूनही खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे.
“गंगा कदम महाराष्ट्राची लेक असली, तरी आज येथे उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू या भारताच्या लेकी आहेत,” असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व खेळाडूंना समान मदत व सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. या विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण असून, दृष्टिबाधित महिला खेळाडूंनी नवा इतिहास रचल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये दिसून आली.