पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पुणे शहराला ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, पुढील वर्षी हा महोत्सव ‘जागतिक पुस्तक महोत्सव’ म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक विश्वास पाटील, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, मुख्य संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, लेखक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, पहिल्या पुणे पुस्तक महोत्सवात सुमारे ११ कोटी रुपये तर दुसऱ्या वर्षी तब्बल ४० कोटी रुपयांची विक्रमी पुस्तक विक्री झाली असून, यावरून वाचकांचा वाढता ओढा स्पष्ट होतो. पुणे ही जगाची पुस्तक राजधानी व्हावी, यासाठी या वर्षी पुणे पुस्तक महोत्सवाने जागतिक स्तरावरील पुस्तकविषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून युनेस्कोमार्फत त्याचे मूल्यमापन सुरू आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या महोत्सवाला भेट दिल्यास पुण्याला जागतिक पुस्तक राजधानीचा दर्जा मिळण्याची शक्यता अधिक बळकट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ई-बुक्सच्या युगातही मुद्रित पुस्तकाचे महत्त्व कायम राहील, असे सांगत श्री. पाटील म्हणाले की, पुस्तक वाचनातून मिळणारा आनंद अनमोल आहे. मराठी भाषा अभिमानाची भाषा असून देशात सुमारे १२ कोटी मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेला चालना देण्यासाठी साहित्य वाचन, मराठी नाटके, चित्रपट आणि गीत ऐकण्याचे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे पुस्तक महोत्सव हा केवळ पुस्तक खरेदीचा उपक्रम न राहता भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा भव्य महोत्सव बनला आहे. मागील दोन वर्षांत विक्रमी पुस्तक विक्री, दर्जेदार चर्चासत्रे, वैचारिक मंथन आणि विविध जागतिक विक्रमांमुळे या महोत्सवाची ओळख देश-विदेशात निर्माण झाली आहे. पुणे हे आधीपासूनच साहित्य, कला आणि संस्कृतीचे केंद्र असून, या महोत्सवामुळे वाचन संस्कृती अधिक समृद्ध होत आहे, असे त्यांनी नमूद केले.
या महोत्सवामुळे अभिजात मराठीसह सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, नवोदित लेखकांना व्यासपीठ आणि सर्व वयोगटात वाचनाची आवड निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. पुढील वर्षी दिल्ली आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
९९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले की, दिल्ली व कोलकाता येथील पुस्तक महोत्सवांप्रमाणेच पुणे पुस्तक महोत्सवही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला येत आहे. हा भव्य उपक्रम भविष्यात पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्यात निर्णायक ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे म्हणाले की, पुणे पुस्तक महोत्सवात ७५० हून अधिक पुस्तक दालने असून, पुणे साहित्य महोत्सवात देशभरातील साहित्यिक व कलाकार सहभागी होत आहेत. पुण्याच्या यशानंतर नागपूर येथे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या काळात गोव्यातही पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. वाचन संस्कृतीची ही चळवळ अखंडपणे पुढे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले की, पुणे पुस्तक महोत्सव हा आता ‘पुणेकरांचा उत्सव’ झाला आहे. पुणे ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, मात्र पुढील वर्षी पुण्याची ओळख ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ म्हणून निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. १६ डिसेंबरपासून होणाऱ्या पुणे साहित्य महोत्सवात १५० हून अधिक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. या कार्यक्रमात लेखक विश्वास पाटील लिखित ‘लस्ट फॉर मुंबई’ या कादंबरीचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी पुणे पुस्तक महोत्सवातील विविध दालनांना भेट देत पुस्तकांची माहिती घेतली.