Home Breaking News पुणे ट्रॅफिकमध्ये मोठा बदल! विमानतळ वाहतूक विभागाचा नवा आदेश जाहीर

पुणे ट्रॅफिकमध्ये मोठा बदल! विमानतळ वाहतूक विभागाचा नवा आदेश जाहीर

69
0
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पुणे विमानतळ वाहतूक विभागाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायदा कलम 115, 116(1)(A)(B), 116(4) व 117 अन्वये नवे वाहतूक नियम तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचे जाहीर केले. अत्यावश्यक सेवेतील फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी वाहने वगळता सर्वांसाठी हे नवे नियम बंधनकारक असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नवीन आदेशानुसार खालील रस्त्यांवर वाहतुकीच्या दिशांमध्ये बदल करण्यात आला आहे. एकेरी वाहतूक घोषित केलेले मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
श्रीकृष्ण हॉटेल चौक → दत्तमंदिर चौक → सीसीडी चौक → गंगापुरम चौक → कैलास सुपर मार्केट चौक → गणपती मंदिर चौक.
तर खालील मार्गांवर दुतर्फा वाहतूक सुरू राहील:
सीसीडी चौक → गंगापुरम चौक, दत्तमंदिर चौक → कैलास सुपर मार्केट चौक, गणपती मंदिर चौक → श्रीकृष्ण हॉटेल चौक.
याआधी या मार्गांवर लागू असलेले सर्व जुन्या प्रकारचे निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. नव्या व्यवस्थेमुळे वाहतुकीचा वेग वाढेल, कोंडी कमी होईल आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सुरळीत प्रवास अनुभवता येईल, असा विश्वास वाहतूक विभागाने व्यक्त केला आहे.
हिंमत जाधव यांनी सांगितले की, “वाहतूक शिस्त राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नवे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण घटेल आणि रस्ते अधिक सुरक्षित होतील. नियमभंग करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
नव्या व्यवस्थेमुळे स्थानिक रहिवाशांबरोबरच विमानतळ परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळेल. वाहतुकीत होणारी उलटापालट, चुकीचे वळण घेणे, अचानक कोंडी निर्माण होणे यावर नियंत्रण मिळणार असल्याचे अधिकारी मानत आहेत.
वाहतूक विभागाने नागरिकांना अपील केले आहे की त्यांनी नव्या मार्गांची माहिती ठेवावी, ट्रॅफिक बोर्ड व सूचनांकडे लक्ष द्यावे आणि अंमलबजावणीदरम्यान पोलिसांना सहकार्य करावे.