मुंबई : कुवैतहून हैदराबादकडे निघालेल्या इंडिगोच्या विमानाला अचानक मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. या घटनेमुळे विमानतळावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. विमानात असलेल्या प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षादल, CISF, एअरपोर्ट ऑपरेशन्स आणि बॉम्ब स्क्वॉड एका क्षणात सक्रिय झाले.
प्राथमिक माहितीनुसार, उड्डाणादरम्यान विमानाच्या सुरक्षा विभागाला एक तांत्रिक संशयास्पद अलर्ट प्राप्त झाला. त्यानंतर वैमानिकाने तत्काळ प्रोटोकॉलनुसार मुंबई एअरपोर्टला डिव्हर्ट करण्याचा निर्णय घेतला. विमानाने सुरक्षितरीत्या लँडिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली. बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडने विमानाची सखोल तपासणी केली असून कोणताही धोका आढळला नाही.
विमानातील 150 हून अधिक प्रवाशी घाबरले होते; लँडिंगनंतर प्रवाशांनी सुस्कारा सोडला. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला अनुभव सांगत क्रू मेंबर्सच्या शांतपणे हाताळलेल्या परिस्थितीचे कौतुक केले.
एअरलाइनने सांगितले की, “सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. अलर्ट मिळताच आवश्यक ती पावले उचलून विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.”
दरम्यान, या घटनेनंतर मुंबई विमानतळावरील सुरक्षेला अधिकच कडक करण्यात आले आहे. विमानाच्या तांत्रिक सिस्टीमची तपासणी सुरू असून, हा अलर्ट नेमका का आला, याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. तत्पूर्वी, प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी दुसरी व्यवस्था करण्यात येत आहे.