पुणे – आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली डॉक्टरपेक्षाही नैसर्गिक शेती करणारा शेतकरी अधिक गरजेचा ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
शिवाजीनगर येथील कृषि महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय नैसर्गिक शेती परिषदेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषि विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार रासायनिक शेतीमुळे भविष्यात गंभीर परिणाम घडू शकतात. जमिनीतले सूक्ष्मजीव पोषक घटक रोपांपर्यंत पोहोचवतात, पण रासायनिक शेतीत हे सूक्ष्मजीव नष्ट होत असल्याने जमिनीचा पोत बदलतो, अन्नातील पोषक घटक कमी होतात. युरियामधील नायट्रोजनमुळे नायट्रस ऑक्साइड तयार होत असल्याने कॅन्सरसारख्या रोगांमध्ये वाढ होत आहे. यापासून मुक्तता नैसर्गिक शेतीच देऊ शकते.
नैसर्गिक शेतीसाठी योग्य बियाणे निवडणे, बिजामृत प्रक्रीया, घनजीवामृताचे योग्य प्रमाणात उपयोग आणि पाण्यासोबज जीवामृत देणे, जमिनीचे आच्छादन करणे आणि बहुपीक पद्धत या पाच बाबी महत्वाच्या असल्याचे नमूद करून ते म्हणाले, नैसर्गिक शेतीमुळे मातीत वाढणारी गांडुळे जमिनीत 10 फूट खोल पर्यंत छिद्रे तयार करतात, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते. देशी गांडुळाच्या प्रजाती आपल्या आयुष्यात 40 ते 50 हजार गांडुळे तयार करतात. त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी जमिनीला 17 प्रकारचे पोषक घटक मिळतात. जीवामृताच्या वापरामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. देशी गायीच्या शेणात उपयुक्त जिवाणू मोठ्या प्रमाणात असतात. शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ व मोठ्या वृक्षाखालची रसायनरहित माती मिसळून जीवामृत 5 दिवसांत तयार होते. उरलेल्या शेणापासून घनजीवामृत तयार करता येते. यामुळे उत्पादन वाढते आणि पौष्टिक अन्न मिळते.
राज्यपाल पुढे म्हणाले, रासायनिक शेती पद्धत पाश्चात्य देशांकडून आलेली आहे. एकेकाळी भारतीय जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनची मात्रा सुमारे 1.5 टक्के होती, ती आता 0.5 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. हा घटक जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो कमी झाल्याने जमिनी पडीक पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच रासायनिक शेती खर्चिक असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. पूर्वी शेतकरी पारंपरिक वाण टिकवत असत. ते पुन्हा टिकवले नाहीत तर परदेशी वाणांवर अवलंबून राहावे लागेल आणि त्यांची बाजारातील मनमानी वाढेल. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक वाणांचे अधिक संशोधन करून ते हवामान बदल व रोगांना प्रतिरोधक करण्याची गरज आहे.
जैविक आणि नैसर्गिक शेतीतील फरक सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, जैविक शेतीमध्ये एक टन शेणखतात फक्त 2 किलो नायट्रोजन असते, तर एक एकर शेतीसाठी 60 किलो नायट्रोजनची गरज असते—म्हणजे दीडशे क्विंटल वर्मी कंपोस्ट लागतो. शिवाय यासाठी अधिक मनुष्यबळ लागते आणि मिथेनसारखे घातक वायू तयार होतात. त्यामुळे नैसर्गिक शेती हा अधिक उपयुक्त पर्याय आहे. जंगलातील वृक्ष कोणत्याही रासायनिक खताविना सदाहरित राहतात याचा उल्लेख करून त्यांनी निसर्गाकडे परतण्याचे आवाहन केले.






