Home Breaking News स्वेटरने दिलं जीवनदान! दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली महिला; आंबेगावमध्ये...

स्वेटरने दिलं जीवनदान! दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली महिला; आंबेगावमध्ये भीतीचे सावट

56
0
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव चिचगाईवस्ती येथे घडलेली एक थरारक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका २९ वर्षीय महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, मात्र तिच्या अंगावरील स्वेटरमुळे तिचं प्राण वाचलं. या प्रसंगानंतर संपूर्ण गावात भीती आणि दहशतीचं वातावरण पसरलं आहे.
घटनेतील पीडित महिला अश्विनी शिवाजी ढोबळे या रात्री सुमारे ९ वाजता घराबाहेर लघुशंकेसाठी गेल्या होत्या. अंधाराचा फायदा घेत बिबट्या त्यांच्या मागे दबा धरून बसला होता. त्या वळताच बिबट्याने झडप घातली, परंतु त्याचा पंजा त्यांच्या स्वेटरमध्ये अडकला, त्यामुळे तो त्यांना ओढू शकला नाही आणि अश्विनी यांना थोडक्यात जीवनदान मिळालं.
क्षणात घडलेल्या या प्रसंगामुळे त्या घाबरून मोठ्याने ओरडल्या, त्यानंतर बिबट्या घाबरून पळून गेला. या धक्कादायक घटनेमुळे त्या काही काळ बेशुद्ध पडल्या, मात्र कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पारगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्या सुखरूप घरी परतल्या असून संपूर्ण गाव त्यांच्या धैर्याची दाद देत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी रुग्णालयात भेट देऊन महिलेशी संवाद साधला. वन विभागाने घटनास्थळी तातडीने पिंजरा लावला असून बिबट्याला पकडण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आंबेगाव, जुन्नर आणि खेड परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेक वेळा शेतात, रस्त्यावर आणि घरांच्या अंगणात बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाकडे “नरभक्षक बिबट्याला जेरबंद करून त्याला गुजरातच्या वनतारा जंगलात सोडावे” अशी मागणी केली आहे, जेणेकरून लोकांच्या जीविताचा धोका कमी होईल.
या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे —

“मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष थांबणार कधी?”

 प्रशासन आणि वन विभाग नागरिकांना सावध राहण्याचे, रात्री एकटे बाहेर न जाण्याचे, तसेच परिसरात प्रकाश व्यवस्था सुधारण्याचे आवाहन करत आहेत.