Home Breaking News पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’चे भव्य आयोजन – भारत-यूके...

पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’चे भव्य आयोजन – भारत-यूके शिक्षण संबंधांना नवी चालना

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘अचिव्हर्स डायलॉग्स – पुणे एडिशन’ हा विशेष शैक्षणिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अल्युमनी युनियन, यूके (NISAU) आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून यामागचा उद्देश भारत आणि युनायटेड किंगडममधील शैक्षणिक संबंध अधिक मजबूत करणे हा आहे.
या भव्य उपक्रमात ब्रिटनमधील नामांकित विद्यापीठांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि यूकेतील भारतीय माजी विद्यार्थी सहभागी झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना ब्रिटनमधील उच्च शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, आर्थिक नियोजन, आणि कॅम्पस जीवन या सर्व गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान इम्पीरियल कॉलेज लंडन, किंग्ज कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो, युनिव्हर्सिटी ऑफ साउथॅम्प्टन, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांसारख्या जगप्रसिद्ध विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून जागतिक शिक्षण पद्धती आणि त्यातील संधींबाबत उपयुक्त माहिती दिली.
पीसीईटीचे विश्वस्त व पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, आणि कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना यूके विद्यापीठांतून शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकायला मिळाले, ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात आणि प्रेरणेत वाढ झाली.
या ‘अचिव्हर्स डायलॉग्स’च्या माध्यमातून भारत-यूके शिक्षण संबंधांना नवी ऊर्जा, आंतरराष्ट्रीय सहकार्याला गती आणि विद्यार्थ्यांसाठी नवे क्षितिज उघडले गेले आहे.