Home Breaking News थरारक फसवणूक प्रकरण! थायलंडमार्गे कम्बोडियात विक्री — स्कॅमिंग कामासाठी परदेशात पाठविलेल्या महिला...

थरारक फसवणूक प्रकरण! थायलंडमार्गे कम्बोडियात विक्री — स्कॅमिंग कामासाठी परदेशात पाठविलेल्या महिला इंजिनिअरची सुटका; अविनाश उढाणवर गुन्हा दाखल

औरंगाबाद | परदेशात नोकरीच्या आश्वासनाने एका तरुणीला थायलंडमार्गे कम्बोडियात विक्री करून स्कॅमिंग कामासाठी भाग पाडण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपी कंपनी मालक अविनाश रामभाऊ उढाण याच्याविरोधात फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ वर्षीय घटस्फोटीत महिला ही इलेक्ट्रीकल इंजिनिअर असून २०२१ मध्ये ती शहरातील लेडीज होस्टेलमध्ये राहून अॅग्रो केअर मशिनरीज या कंपनीत नोकरी करत होती. त्यानंतर २०२५ मध्ये तिने उल्कानगरी रोडवरील एफ व्होल्ट कंपनीत काम सुरू केले. तेथेच तिची आरोपी अविनाश उढाण याच्याशी ओळख झाली. त्याने तिला थायलंडमध्ये मार्केटिंग मॅनेजर पदाची आकर्षक नोकरी असल्याचे सांगून तिच्याकडून १.५ लाख रुपये घेतले.
महिलेने सांगितल्याप्रमाणे, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती दिल्ली विमानतळावरून थायलंडला रवाना झाली. बँकॉकमध्ये पोहोचताच हरप्रित सिंग नावाचा व्यक्ती तिला घेण्यासाठी आला आणि टॅक्सीने कम्बोडियातील कम्पोट गाती येथील क्रिएटिव्ह माइंडसेट नावाच्या कंपनीत तिला नेऊन सोडले. तेथे तिच्याकडून ऑनलाइन स्कॅमिंग आणि आर्थिक फसवणुकीची कामे जबरदस्तीने करवली जात होती.
तिला कळले की, अविनाश उढाणने तिला बेकायदेशीर स्कॅमिंग नेटवर्कमध्ये विकले आहे. दोन महिने अडकून राहिल्यानंतर, अखेर तिने २,००० अमेरिकन डॉलर भरून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर कम्बोडियातील भारतीय दूतावासाच्या मदतीने २१ ऑक्टोबर रोजी ती मुंबईत परतली.
भारतामध्ये आल्यानंतर तिने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अविनाश उढाणविरोधात तक्रार दाखल केली. तसेच मुंबईतील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनीही या प्रकरणात बेकायदेशीर मानव तस्करी आणि फसवणुकीचे स्वरूप दिसून आल्याने सहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
या घटनेने औरंगाबाद व पुणेच्या रोजगार बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. परदेशात आकर्षक नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका, असा सतर्कतेचा इशारा पोलिसांनी नागरिकांना दिला आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा उघड केले आहे की, ऑनलाइन नोकरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि मानव तस्करीचे जाळे किती खोलवर पसरले आहे.