पुणे शहरात अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचे आव्हान अधिक तीव्र झाले असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर येथील पथक पेट्रोलिंग करत असताना लोहगाव-वाघोली रस्त्यावरील शिवकर वस्ती परिसरात संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमावर पोलिसांनी नजर ठेवली.
तो इसम काळ्या रंगाची सॅग खांद्यावर अडकवून कोणाचीतरी वाट पाहत उभा असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन विचारपूस केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तत्काळ सतर्कतेने पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत त्याने आपले नाव तुलसिदास किसनदास वैष्णव (वय ३०, रा. उदयपूर, राजस्थान) असे सांगितले.
त्याच्याकडे तपासणी केली असता पोलिसांना तब्बल २२ लाख ३९ हजार २०० रुपयांचा ऐवज मिळून आला. यात १ किलो ११२ ग्रॅम अफिम (अंमली पदार्थ) ज्याची किंमत सुमारे २२ लाख २४ हजार रुपये असून, त्याच्याकडून १५ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची सॅग देखील जप्त करण्यात आली.
या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६९/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), १७(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हवाले, वाघोली पोलीस स्टेशन हे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, तसेच पोलीस अंमलदार सचिन माळवे, विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, संदीप शिर्के, दयानंद तेलंगे, विपुल गायकवाड, संदेश काकडे आणि दत्ताराम जाधव यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.
पुणे पोलिसांकडून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, शहरात अंमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध सुरू असलेली मोहीम आणखी गती घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नागरिकांनी देखील अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.