Home Breaking News पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

150
0
पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर याचा मृत्यू झाला आहे. तीन गोळ्या झाडल्यानंतर गोविंद गंभीर जखमी झाला होता, मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्लेखोरांनी थेट गोविंद कोमकरवर लक्ष्य साधले होते. शहरात गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना अशा प्रकारचा रक्तरंजित प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेचे पथकही तपासात सहभागी झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
नाना पेठ परिसरातील या गँगवॉरमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेबाबत मोठे आव्हान उभे राहिले आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.