महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” म्हणून मान्यता दिली असून तो आता अधिकृतरीत्या “महागणेशोत्सव” या नावाने साजरा होणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगतदार होणार असून सर्वत्र विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
पुणे पोलीस मुख्यालयात यानिमित्ताने 28 ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये साऊंड अँड लाईट डिस्प्ले, पोलीस बॅण्ड, पाईप बॅण्ड, डॉग शो यांचा समावेश होता. तसेच शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन यामुळे ऐतिहासिक वारशाची झलक अनुभवायला मिळाली. ‘मिशन परिवर्तन’ तर्फे गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते, ज्यातून भक्तगणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार (भा.पो.से.) यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस सहआयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रशासन श्री. संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग श्री. राजेश बनसोडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास पोलीस कुटुंबीय, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. वातावरणात उत्साह आणि भक्तीभाव ओसंडून वाहत होता.
राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाला सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक प्रेरणा आणि सामाजिक ऐक्याचे नवे परिमाण लाभणार आहेत. पुण्यातील पोलिसांनी घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.