Home Breaking News गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; दारूबंदी, डीजेबाबत पुनीत बालन यांचा महत्त्वाचा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; दारूबंदी, डीजेबाबत पुनीत बालन यांचा महत्त्वाचा निर्धार आणि कोकणवासीयांसाठी एसटीची खास सोय

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडप उभारणी, मूर्तींचे आगमन, सजावट आणि सामाजिक उपक्रमांची लगबग सुरू आहे. उत्सव मोठ्या प्रमाणात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणांनी सज्जता दाखवली आहे.
दारू विक्रीवर बंदी
गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार होऊ नयेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व दारू दुकाने २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गणेश चतुर्थी आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी राहील. पाचव्या व सातव्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणूक मार्गावरील दारू दुकानेही बंद राहतील. या निर्णयामुळे उत्सव उत्साहात आणि सुरक्षिततेत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पुनीत बालन यांचा डीजेबाबत निर्धार
पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव आज जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाला आहे. याच उत्सवाचे धार्मिक स्वरूप आणि परंपरा जपण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी यंदा मोठा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, “जे गणेश मंडळ डीजे वाजवतील, त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा जाहिरात दिली जाणार नाही.” धार्मिक व सांस्कृतिक शिस्तीचे पालन करण्यासाठी हा पाऊल उचलण्यात आले आहे.
कोकणवासीयांसाठी एसटी बसची सोय
दरम्यान, गणेशोत्सव म्हटले की कोकणवासीय आपल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निघतात. यासाठी एसटी प्रशासनाने विशेष सोय केली आहे. यावर्षी कोकणात जाणाऱ्या भाविकांनी १४१ एसटी बसेसचे ग्रुप बुकिंग केले आहे. प्रत्येकी ४२ प्रवाशांच्या गटांसह या बसेस २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान सोडल्या जाणार आहेत. शिवाय ज्या प्रवाशांनी ग्रुप बुकिंग केलेले नाही, त्यांच्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
 प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि आनंदी वातावरणात पार पडेल अशी अपेक्षा सर्वत्र आहे.
गणेशोत्सवात पुण्यात दारूबंदी; डीजेवाल्यांना पुनीत बालन यांचा इशारा, कोकणवासीयांसाठी एसटीच्या विशेष बसेस