Home Breaking News भीषण अपघातात कबाजी कोळपेचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

भीषण अपघातात कबाजी कोळपेचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

पाटस : मोरगाव-सुपा-चौफुला या अष्टविनायक महामार्गावर पळवी गावाजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघात घडला. खडीने भरलेला डंपर (हायवा) वेगाने जात असताना त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे दुचाकी रस्त्यावर फेकली गेली आणि दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली.
या अपघातात कबाजी भिमाजी कोळपे (वय 65, रा. वाई, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी अलका कबाजी कोळपे (वय 60) या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोघे जण दुचाकीवरून पळवी गावाच्या दिशेने जात असताना समोरून आलेल्या वेगवान डंपरने धडक दिली. अपघात इतका भयानक होता की कोळपे यांच्या अंगावरून वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पाटस पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय जगदळे, हवालदार गणेश मुठेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
दरम्यान, पोलिसांनी हायवा ताब्यात घेतला असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी महामार्गावरील अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हा अपघात सकाळी १० ते १२ च्या सुमारास घडला असून या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी मृत व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाकडे या मार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले आहे.