महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असलेला, भक्तिभाव आणि उत्साहाचा संगम असलेला गणेशोत्सव यंदा अधिक भव्यतेनं आणि अभिमानानं राज्य उत्सवाच्या रूपात साजरा होणार आहे. राज्य सरकारनं तब्बल ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून या उत्सवाची तयारी अधिक दिमाखदार करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळं आणि घरगुती आरास स्पर्धा, आकर्षक ड्रोन शो, रोषणाईची सजावट, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे गणरायाचं आगमन अधिक रंगतदार होणार आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील लोक या उत्सवात भाविकतेनं सहभागी होतात, पण यंदा राज्यस्तरीय मान्यता मिळाल्यानं उत्सवाचा सोहळा अधिक भव्य आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, गणेशोत्सव ही फक्त भक्तीची नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि समाजभावनेची जपणूक करणारी महत्त्वाची परंपरा आहे. समाज एकत्र येऊन गणपती बाप्पाचं स्वागत करताना सामाजिक ऐक्य, एकोपा आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की, गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवचैतन्य मिळेल आणि पर्यटक, भाविक व नागरिक सर्वांसाठी हा सोहळा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.
“गणपती बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण होवो आणि महाराष्ट्र अधिक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करो,” अशी प्रार्थना शासनाने व्यक्त केली.