Home Breaking News “गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे” – आमदार महेश लांडगे यांचा उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष...

“गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नव्हे” – आमदार महेश लांडगे यांचा उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा; गोसंवर्धनावरून दोन दादांमध्ये पुन्हा आमने-सामने

23
0
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी गोरक्षकांवरील खोटे आरोप आणि गोरक्षणावर लावण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत खणखणीत भूमिका मांडली आहे. इंदापूर येथे वीर सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढी आणि समाधीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनात ते बोलत होते.
लांडगे म्हणाले, “गोरक्षण म्हणजे चिंचोका खेळणं नाही, तर हा धर्मरक्षणाचा आणि गोमातेच्या संवर्धनाचा पवित्र कार्य आहे. एखाद्या गाडीचा पाठलाग करून गोवंशाची अवैध वाहतूक थांबवणे किती धोकादायक असते, हे अशा मोहिमेत सहभागी झालेल्यांनाच समजते. काही लोक चुकीच्या पद्धतीने गोरक्षकांविषयी प्रशासनाला दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. अशा प्रकारचे खोटे आरोप आम्ही सहन करणार नाही.”
त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे टीका केली. तीन दिवसांपूर्वी कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गोरक्षकांविषयी नकारात्मक मांडणी केली होती, आणि त्यानंतर अजित पवार यांनी पोलिसांना “गोरक्षकांना आवर घाला” अशा सूचना दिल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
लांडगे पुढे म्हणाले, “एखादा जिहादी किंवा कुरेशी समाजातील व्यक्ती सांगते की गोरक्षक आमचे नुकसान करतात, त्यांना नेमकी अडचण काय आहे? आम्ही जुन्नरमधील बेकायदेशीर कत्तलखाने बंद केले आहेत आणि गोमातेचे रक्षण करणार आहोत. गोरक्षकांवर बंदी घालण्याची भाषा सहन केली जाणार नाही. गोरक्षण, लव्ह जिहाद, लॅंड जिहाद, धर्मांतर – काहीही खपवून घेणार नाही. हे हिंदुत्ववादी महायुती सरकार आहे. गोरक्षकांनी घाबरण्याचे कारण नाही.”
या वक्तव्यामुळे गोरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा दोन ‘दादा’ अप्रत्यक्षपणे आमने-सामने आले आहेत. राजकीय वर्तुळात या घडामोडींची मोठी चर्चा रंगत आहे.