नवी दिल्ली | राजधानीत आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा खरक सिंग मार्गावर खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या १८४ टाइप-७ बहुमजली सदनिकांचे भव्य उद्घाटन केले. आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आणि पर्यावरणपूरक पद्धतीने बांधलेल्या या सदनिका संपूर्ण भारतातील खासदारांना एकाच छताखाली आणणार आहेत.
पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरुवात उद्घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी पंतप्रधान निवासी परिसरात ‘सिंदूर’चे रोप लावून हरित भारताच्या दिशेने एक प्रतिकात्मक पाऊल टाकले. हा उपक्रम पर्यावरण संरक्षण, टिकाव आणि नैसर्गिक संतुलन राखण्याच्या संदेशाचा भाग होता.
श्रमजीवींशी संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी सदनिकांच्या बांधकामात योगदान दिलेल्या श्रमजीवींशी संवाद साधला, त्यांचे अनुभव जाणून घेतले आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “ही बांधकामे केवळ विटा-मातीची नाहीत, तर आपल्या परिश्रम, समर्पण आणि देशसेवेच्या भावनेचे प्रतीक आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
एक भारत, श्रेष्ठ भारताचे प्रतिबिंब या नवीन टाइप-७ सदनिका विविध राज्यांमधून आलेल्या खासदारांना एकत्र राहण्याची, संवाद साधण्याची आणि राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव घेण्याची संधी देतील. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नमूद केले की, “येथे सण, परंपरा, आणि भारताच्या विविधतेचा उत्सव साजरा होईल. हा परिसर ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या विचाराचा जिवंत नमुना ठरेल.”
आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि टिकाव या सदनिकांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, पाणी व वीज बचत तंत्रज्ञान, सौरऊर्जा वापर, हरित बागा आणि व्यायामशाळा यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या सदनिका केवळ निवासस्थान नसून, प्रेरणादायी कार्यासाठीचे केंद्र ठरणार आहेत.